प्रशांत भुषण यांना इशारा देऊन सोडून द्या

केंद्र सरकारच्या वकिलाची सर्वोच्च न्यायालयात सुचना

नवी दिल्ली – सरन्यायाधिश आणि सर्वोच्च न्यायालयाची बेअदबी केल्याच्या कारणावरून दोषी ठरवण्यात आलेले प्रख्यात वकिल प्रशांत भुषण यांनी आज पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांविषयी कोर्टाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणात मी जर माफी मागितली तर मी माझ्या सदसदविवेक बुद्धीशी केलेली ती प्रतारणा ठरेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान कोर्टाने सरकारी वकिलाला या प्रकरणात काय भूमिका घ्यावी अशी विचारणा केली त्यावेळी सरकारी वकिलांनी भूषण यांना कोर्टाने हुतात्मा करू नये. त्याऐवजी त्यांना समज देऊन सोडून द्यावे अशी सुचना केली आहे. या विषयावर आता नंतर निर्णय घेतला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांनी माफी मागण्यासाठी आज पुन्हा एक संधी देऊ केली होती. पण त्यास भूषण यांनी स्पष्ट नकार दिला. त्यावर न्या. अरूण मिश्रा यांनी त्यांना उद्देशून म्हटले की जर तुम्ही कोणाला तरी दुखावले असेल तर तुम्ही माफी मागण्यात तुमचे काय नुकसान आहे? तुमच्या वक्तव्यामुळे जर कोणी दुखावले गेले असेल तर त्यावर फुंकर घालणे हे तुमचेच काम आहे. भुषण यांच्यावतीने कोर्टात शंभर पानी उत्तर देण्यात आले आहे. त्यात त्यांनी आपण का माफी मागणार नाही याचा खुलासा केला आहे. आपण ट्‌विटरवर जी विधाने केली आहेत त्यावर आपण ठाम आहोत असे त्यांनी यात नमूद केले आहे.

अशी माफी मागणे म्हणजे आपल्या सद्‌सद्विवेक बुद्धीशी ती प्रतारणाच ठरेल असेही प्रशांत भूषण यांनी यात म्हटले आहे. कोर्टाने प्रशांत भुषण यांना आपली वक्तव्ये मागे घेऊन माफी मागण्याची पुन्हा एक संधी दिली होती. त्यावर त्यांनी ही नकाराची भूमिका घेतली.

त्यांच्या वकिलांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांनी त्यांच्यावरील टीकेचा स्वीकार केला पाहिजे. नुसती टीका नव्हे तर कडक टिकाही कोर्टाने ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे.

यावर कोर्टाने सरकारी वकिलांना त्यांचा अभिप्राय मांडण्याची सुचना केली, त्यावेळी सरकारी वकिलांनी भूषण यांच्या वक्तव्यांना फार महत्व न देता त्यांना समज देऊन सोडून देण्याची सुचना केली. 

प्रशांत भुषण यांना न्यायालयाने हुतात्मा ठरवता कामा नये अशी टिप्पणीही त्यांनी केली. ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी कोर्टाच्या असेही निदर्शनाला आणून दिले की, न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक विद्यमान न्यायाधिश आणि माजी न्यायाधिशांनीही आवाज उठवला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.