fbpx

दसऱ्याला शिवभोजन केंद्रावर पुरण पोळीचे जेवण

इस्लामपुरातील उपक्रम

इस्लामपूर – विजया दशमी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर (जि. सांगली) येथील शिवभोजन केंद्रावर केंद्र संचालकांनी तब्बल दीडशे जणांना पुरण पोळीचे जेवण खाऊ घातले. सहा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी गरीब गरजू नागरिकांची भूक भागवत आहे. 

आज सर्वत्र दसरा सणाच्या दिवशी गोड-धोड मिष्ठान्न भोजन असते.सध्या गरिबांच्या घरी चूल पेटणे मुश्कील झाली असतांना पुरण पोळी खाऊन नागरिक तृप्त झाले. भरपेट जेवल्यानंतरचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. 

येथील प्रशासकीय इमारतीच्या शेजारी असणाऱ्या हॉटेल पंगत येथील महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन केंद्रावर रविवारी सकाळी छोटेखानी कार्यक्रम झाला. हातकणंगलेच्या खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी सौ. वेदांतिका माने यांच्यासह प्रांताधिकारी नागेश पाटील,नगरसेविका सीमा पवार,पुरवठा अधिकारी बबन करे, विनोद मोहिते, विनायक नायकल यांच्या हस्ते पुरण पोळी असणाऱ्या शिवभोजन थाळीचे वितरण झाले. केंद्र संचालिका अलका शिंदे आणि रणजित शिंदे यांनी स्वागत केले.

कोरोनाच्या परिस्थितीत अनेकांची एकवेळ खाणे अन् जगण्याची धडपड सुरू आहे. गेली साडे सहा महिने या शिवभोजन केंद्रावर तब्बल २७ हजारांहून अधिक थाळीचे वितरण झाले आहे. रविवारी दसरा सण असल्याने केंद्र संचालिका अलका शिंदे यांनी आपल्या सहकारी सुलाबाई साळुंखे,अनिता शिंदे व घरातील महिलांच्या मदतीने पहाटे लवकर उठून तब्बल पाचशे पोळ्या लाटल्या. तयार पोळ्या, बटाट्याची भाजी,आमटी, पापड, गुळवणीने आजची थाळी सजली होती. पोटभर जेवण झाल्यावर समाधानाची भावना व्यक्त केली गेली.

सौ. वेदांतिका माने म्हणाल्या,” अत्यंत गरजूंना शिवभोजन थाळी जगण्याचा हातभार आहे. सणासुदीला गोड-धोड जेवण दिल्याने गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद न्याहाळता आला.  खूपच आगळावेगळा उपक्रम राज्याला पथदर्शी असा आहे.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.