भवानीनगरच्या छत्रपती कारखान्यात गळीतनाट्य परिपत्रकाची इंदापूर, बारामती तालुक्यात चर्चा       

भवानीनगर –  विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात ऊस गळीत हंगाम शुभारंभ रविवारी सकाळी  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  कारखान्याने काढलेल्या परिपत्रकावरून आणि जाचक यांच्या नाराजीवरून इंदापूर आणि बारामती तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ सकाळी 11 वाजता संचालक मंडळ यांच्या हस्ते घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु आदल्या दिवशी शनिवार (दि. 24) परिसरामध्ये चर्चा सुरू झाली की, विजयादशमी दिवशी सकाळी नऊ वाजता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे.

यामुळे साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता पुन्हा ऊस गळीत हंगाम शुभरंभ घेणार आहोत. याबाबत परिसरांमध्ये चर्चा सुरू झाल्याने आज सकाळी पृथ्वीराज जाचक व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे एकाच वेळी कारखान्यात दाखल झाले. दत्तात्रय भरणे यांनी थोड्याच वेळात जाचक यांना तुम्ही व संचालक मंडळ मिळून ऊस गळीत हंगाम शुभारंभ करा, मला जायचे आहे लगेच, अशी विनंती केली.

त्यावेळी पृथ्वीराज जाचक म्हणाले की,  तुमचाही वेळचा मुहूर्त झाला आहे व आमचाही वेळचा मुहूर्त झाला आहे. असे म्हणत एकमेकांनी एकमेकांना होकार देत यावर्षीचा 65 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळासहित राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडला. परंतु   नक्की कारखान्यात काय सुरू आहे, याबाबत सभासद मात्र संभ्रमात पडले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.