चंदीगढ – पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सरकार स्थापनेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशात पंजाबमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आणि तो कोणत्या पक्षाचा आहे याची माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि पंजाब इलेक्शन वॉचने याबाबत माहिती दिली आहे.
त्यानुसार, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल हे पंजाबमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. बादल यांची संपत्ती 202 कोटी रूपये असून ते पंजाबमधील जलालाबाद या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बादल यांनी पाच वर्षात त्यांची संपत्ती तब्बल शंभर कोटींनी वाढल्याचे घोषीत केले आहे.
दरम्यान, 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांची संपत्ती 102 कोटी रूपये असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर 2017 पासून 102 वरून संपत्ती आता 2022 मध्ये 202 कोटी रूपये झाल्याचे बादल यांनी जाहीर केले आहे.
तसेच काँग्रेस नेते मनप्रीत सिंह बादल यांची संपत्ती पाच वर्षात 40 कोटींनी वाढली असून सध्या 72 कोटी असल्याचे त्यांनी घोषीत केले आहे. ते बठिंडा शहर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. तर आम आदमी पक्षाचे नेते अमन अरोरा यांची संपत्ती 29 कोटी रुपयांनी वाढली असून सध्या 95 कोटी रूपये झाली आहे. ते सुनाम मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांची संपत्ती 48 कोटींवरून 68 कोटी झाली आहे. ते पूर्वीच्या पटियालाच्या राजघराण्यातील आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे वैयक्तिक कोणतेही वाहन नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.