पुणे – पुनीत बालन ग्रुप आयोजित फ्रेंडशिप करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत पुनीत बालन ग्रुप, दगडूशेठ वॉरियर्स, मंडई मास्टर्स, साई पॉवर हिटर्स, तुळशीबाग टस्कर्स आणि महालक्ष्मी माव्हरीक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अनिकेत कुंभार याच्या खेळीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप लायन्स संघाने जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाचा 8 गडी राखून सहज पराभव केला. अमोल चव्हाण याच्या 54 धावांच्या खेळीमुळे दगडूशेठ वॉरियर्स संघाने शितळादेवी सुपरनोव्हाज संघाचा 6 गडी राखून पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. मंडई मास्टर्स संघाने युवा योद्धाज संघाचा 17 धावांनी पराभव करत आगेकूच केली.
साई पॉवर हिटर्स संघाने कसबा सुपर किंग्ज संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. तुळशीबाग टस्कर्स संघाने गुरुजी तालीम टायटन्स संघाचा 17 धावांनी पराभव करून आगेकूच केली. चारुदत्त भैरट याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महालक्ष्मी माव्हरीक्स संघाने जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाचा केवळ एका धावेने पराभव करून स्पर्धेत पहिला विजय नोंदविला.