पुणे – राजकीय मतभेद असले, तरी पुण्याच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येतात, याचा प्रत्यय दरवर्षी मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीला दिसून येते. मात्र, यावर्षी मिरवणुकीच्या सुरुवातीला मानापमान नाट्य रंगले. तर भाजपचेच पदाधिकारी या ठिकाणी असल्याने कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही आधीच निघून जाणे पसंत केले.
दरवर्षी महापौरांच्या हस्ते मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात येते. यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. मात्र, स्वागत कक्षात केवळ पालकमंत्री पाटील आणि आमदार मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार मोहन जोशी आणि आमदार धंगेकर यांनी दुसऱ्या बाजूलाच थांबणे पसंत केले. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतानाही धंगेकर उपस्थित नव्हते. त्यानंतर कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आमदार धंगेकर, माजी आमदार जोशी तसेच कॉंगेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि पदाधिकारी निघून गेले. पालकमंत्र्यांनी कसबा गणपतीची आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.
मात्र, यावेळी कॉंगेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, तसेच सतीश देसाई, माजी महापौर कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले देखील उपस्थित होत्या. मात्र, कोणीही कोणाशी संवाद साधताना दिसून आले नाहीत. त्यामुळे राजकीय सुसंस्कृतपणाचा दाखला दिल्या जाणाऱ्या पुण्यात यंदा राजकीय विसंवादाचे चित्र दिसून आले.
कॉंग्रेसवगळता अन्य पक्षांच्या शहराध्यक्षांची पाठ
या विसर्जन मिरवणुकीकडे कॉंग्रेसवगळता सर्वच शहराध्यक्षांनी पाठ फिरवली. यात कॉंग्रेस शहराध्यक्ष (शरद पवार गट) प्रशांत जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, ठाकरे गटाचे दोन्ही शहर प्रमुख, तसेच भाजपचे शहरप्रमुख धीरज घाटे, मनसेचे शहर प्रमुख साईनाथ बाबर यांनी विसर्जन मिरवणुकीकडे पाठ फिरवली. मागील वर्षी आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विसर्जन मिरवणुकीस उपस्थित होते. पण, यंदा हे दोघेही आले नाहीत.