स्वच्छ पुरस्काराकडे पुणेकरांची यंदाही पाठ

45 लाख लोकसंख्येतून अवघ्या 452 प्रवेशिका


देशातील पहिल्या 10 शहरांमध्ये नाव आणण्यासाठी महापालिकेची धडपड


स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यात अपयश

पुणे – देशातील पहिल्या 10 शहरांमध्ये पुण्याचे नाव आणण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू असली तरी, यासाठी घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणेकरांचा सहभाग वाढविण्यात पुन्हा अपयश आले आहे. या सर्वेक्षणात महापालिकेचे गुणांकन वाढावे, जास्तीत जास्त सोसायट्या, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी उपक्रम तसेच स्वच्छता प्रकल्पांद्वारे स्वच्छतेची जनजागृती करावी या उद्देशाने महापालिकेकडून 28 लाख रुपयांची बक्षिसे ठेवत स्वच्छ पुरस्कार स्पर्धा घेतली आहे. मात्र, 45 लाख लोकसंख्या आणि 9 लाख मिळकती असलेल्या पुण्यात या पुरस्कारासाठी केवळ 452 प्रवेशिका दाखल झाल्या आहेत.

केंद्राकडून 2015 पासून स्वच्छ भारत अभियान योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग घेऊन शहर स्वच्छतेसाठी उपक्रम राबविणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी या अभियानांतर्गत केंद्राकडून स्वच्छ शहराची स्पर्धाही घेण्यात येते. गेल्या 4 वर्षांत केवळ एकदाच महापालिकेला देशात 9 वा क्रमांक मिळाला होता. तर, मागील वर्षी थेट 37 व्या क्रमांकावर फेकली गेली. या चारही वर्षांत महापालिकेस नागरिकांच्या लोकसहभागात अपयश आल्याचे चित्र होते. त्यामुळे जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्चूनही लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचाही प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा थेट 28 लाखांची बक्षिसे देण्याचा निर्णय घेत लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात वेगवेगळ्या 12 घटकांसह महापालिका कर्मचाऱ्यांसाठीही पुरस्कार ठेवले आहेत. त्यात शहरातील 452 प्रवेशिका असून पालिकेच्या 230 कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

28 घटकांसाठी 24 लाखांची बक्षिसे
स्वच्छ स्पर्धेसाठी एकूण 28 विविध घटकांमध्ये 24 लाखांची बक्षिसे आहेत. त्यात स्वच्छ प्रभागापासून स्वच्छ सोसायट्या आणि वैयक्‍तीक स्वरुपाच्या बक्षिसांचाही समावेश आहे. तर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विविध घटकांसाठी बक्षिसे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.