पुणे – ढगाळ वातावरणामुळे घटलेले कमाल तापमान 24 तासांत सरासरी एक ते दोन अंशांनी वाढले. त्यामुळे शनिवारी (दि. 13) उन्हाचा चटका वाढला होता. तसेच दिवसभर उकाड्याने पुणेकर हैराण झाले असून, कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक 41.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत शहरातील हवामान कोरडे राहील, तर कमाल तापमानात आणखी एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहरातील मागील तीन आठवड्यांपासून शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेले असून, ते दररोज उच्चांकी तापमान गाठत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून, विशेषत: शिरूर, कोरेगाव पार्क, वडगावशेरी, मगरपट्टा आणि हडपसर या भागात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, राज्यातील अवकाळी पावसामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून दिवसभर ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली होती. मात्र, आज दिवसभर उन्हाचा पारा पुन्हाचा वाढला असून, 40 अंशाच्या खाली आलेले कमाल तापमान आज 42 अंशावर पोहचले.
शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागातील कमाल तापमान
कोरेगाव पार्क – 41.4, शिरूर – 41, मगरपट्टा – 40.6, वडगावशेरी – 40.5, चिंचवड – 40.1, हडपसर – 39.9, पुरंदर 39.7, शिवाजीनगर – 39.1, पाषाण – 39, एनडीए – 38.8, हवेली – 38.6, दौंड – 38.1, बारामती – 37.2