पुणे : व्यावसायिक पतीला पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना वानवडी भागात घडली. दरम्यान लग्नाच्या अनिव्हर्सरी निम्मित दुबईला नेले नाही आणि महागडे गिफ्ट न दिल्याने पत्नीने शुक्रवारी पतीला मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाला.
निखिल पुष्कराज खन्ना (वय-३६, रा. गंगा सॅटेलाईट, वानवडी) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी रेणुका निखिल खन्ना (वय-३८, रा, गंगा, सॅटेलाईट) हिला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही घटना शुक्रवारी (दि. २४) रोजी दुपारी साडेबारा ते एकाच्या दरम्यान वानवडी येथील गंगा सॅटेलाईट या सोसायटीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, निखिल खन्ना हे रियल इस्टेटचे काम करायचे. तर पत्नी रेणुका ही पती निखिल यांच्या कामात मदत करत होती. निखिल खन्ना आणि रेणुकाचा २०१७ मध्ये प्रेम विवाह झाला होता. लग्नाच्या ६ वर्षांनंतरही या दोघांना मुलबाळ नव्हते. निखिल खन्ना त्याची पत्नी आणि आई- वडील असे चार जण सोबत राहत होते. निखिल खन्ना आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत असे.
१८ नोव्हेंबर रोजी निखिल खन्ना आणि रेणुका यांची लग्नाची अनिव्हर्सरी होती. निखिल खन्नाने पत्नीला अनिव्हर्सरी निमित्त दुबईला जाऊ असे सांगितले होते. मात्र काही कारणामुळे हे दोघे दुबईला जाऊ शकले नाही. यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. यामुळे निखिल खन्नाने पत्नीला सांगितले की, दुबई ऐवजी आपण दिल्लीला जाऊ तिथे तुला महागडे गिफ्ट देतो असे सांगितले होते. मात्र निखिलने रेणुकाला दिल्लीला पण नेले नाही आणि महागडे गिफ्ट सुद्धा दिले नाही.
यामुळे शुक्रवारी निखिल आणि रेणुका खन्ना मध्ये जोराचे भांडण झाले. यावादातून रेणुकाने पती निखिल खन्ना यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. यामुळे पती निखिल खाली कोसळले तसेच त्यांच्या नाकातून भरपूर रक्त सांडले. यानंतर पत्नी रेणुकाने डॉक्टर असणाऱ्या निखिलच्या वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच निखिलचे वडील घरी आले. यावेळी निखिल खन्ना अस्वस्थ पडले होते आणि त्यांच्या रक्तातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर आले होते. निखिलच्या वडिलांनी त्याला तपासून सीपीआर दिला. मात्र त्याचा काही उपयोग होत नसल्याने फोन करून एम्बुलेंस बोलावून घेतले. यानंतर निखिलला एम्बुलेंस मधून ससून मध्ये नेण्यात आले. मात्र ससून मध्ये पोहचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी निखिल खन्नाला मृत घोषित केले. याप्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.
१५ दिवसापूर्वी रेणुका खन्नाने घरात काम करणाऱ्या मोलकरणीला ही मारहाण केली होती. मोलकरणीने याची पोलीस चौकीत केली होती. यांनतर रेणुका खन्नाला पोलीस चौकीत बोलाविण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी रेणुका खन्नाला समज देऊन सोडून दिले होते.