नवी मुंबई- राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आता नवी मुंबईत (Navi mumbai) एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील उलवे येथे एक कार आणि ट्रकची धडक झाली आहे. (car-truck accident)
या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारा उलवे जवळ हा अपघात झाला. (Accident news)
मिळालेल्या माहितीनुसार, एक कार उलवे येथून बेलापूरच्या दिशेने जात असतानाच कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. त्यावेळी ट्रक चालक खाली उतरला होता. ही धडक एवढी भीषण होती की ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.
त्यानतंर कार पुढे जाऊन एका स्कूटीवरही जाऊन धडकली. तर स्कुटीचालक आणि कार चालक दोघेही गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. या घटनेत कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे.