पुणे – आयपीएल सट्टाबाजीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागाचा संशय असणाऱ्या एका बुकीला त्याच्या घरावर छापा टाकण्याआधी पोलिसांतील त्याच्या टीपरने माहिती दिली असल्याची शक्यता असून त्याचा शोध खात्यांत घेतला जात आहे.
दरम्यान, या रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार दस्तूरखुद्द पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच केला असल्याने या बुकीच्या ललित कथेतील नायक धास्तावला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
पुणे पोलिसांनी आयपीएल सट्टाबाजीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट रविवारी उघड केले. यात दोन बडे बुकी जाळ्याला लागले. मात्र एक बुकी निसटला. त्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी कोणत्याही संशयास्पद गोष्टी अथवा पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर सध्या तरी कारवाई केली नाही. हे बुकी गेले वर्षभर पोलिसांच्या रडारवर होते. त्यांचा सट्टाबाजाराशी आणि आंतरराष्ट्रीय बेटींग रॅकेटशी असणाऱ्या संबंधाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
त्याचवेळी पोलिसांना घरातील छाप्यात काहीच कसे आक्षेपार्ह सापडले नाही याबाबत पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे छाप्याची टीप त्याला मिळाली असण्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहेत. त्यानुसार खात्यातील या खबऱ्याचा शोध युध्द पातळीवर घेतला जात आहे. तो सापडल्याचा हा बडा मासा गळाला लागण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
तांत्रीक व इतर सर्व प्रकारचा तपास करुन त्याचा सट्टेबाजीशी पोलीस अधिकाऱ्याशी असलेला संबंध शोधला जात आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणारे बडे रॅकेट हाती आल्यावर तपासात काही मोठ्या हस्तींची नावे पुढे येत आहेत.
मात्र पोलीस भक्कम पुरावे हाती आल्यावरच संबंधित व्यक्तींना हात घालणार आहेत. यामध्ये तीन नावे आघाडीवर होती. दरम्यान पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे शहरातील सट्टेबाजांना मोठा धक्का बसला आहे. सट्टेबाज तांत्रिकदुष्टा एक पाऊल पुढे चालत असतात. मात्र छापासत्रामुळे पोलीसही तांत्रिकदुष्टया मागे नसल्याचे दिसत आहे.
दोन दिवसांपुर्वी एका संशयीत बुकीच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. तेथे आक्षेपार्ह काही आढळले नाही. मात्र आमचा तपास सुरु असून अटक बुकींच्या संपर्कात असलेल्यांचीही माहिती घेतली जाणार आहे
शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक