पुणे – शहरात अर्बन स्ट्रीट अंतर्गत पदपथ करताना महापालिका प्रशासनाकडून केवळ निधी खर्च करण्यासाठी काम केले जात असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. प्रभात रस्त्याला महापालिकेकडून नव्याने पदपथ विकसित करण्यात आले असून या पदपथांची उंची प्रभाग रस्त्याच्या गल्ल्यांमधील रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक आहे.
त्यामुळे या रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी पदपथ तयार करताना सुविधाच न केल्याने अनेक रस्त्यांवर पाण्याची तळी साचत आहेत. तर त्या पेक्षाही धोकादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचत आहे. अशा ठिकाणी महावितरणचे वीज पुरवठा सुरू असलेले फिडर पिलर असून हे पाणी त्यात शिरत असल्याने पाण्यात वीज प्रवाह उतरून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
पाणी निचऱ्याची सुविधा नाही
महापालिकेकडून दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर नव्याने पदपथ तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच रस्ता अरूंद झालेला आहे. त्यातच, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गल्ल्या असून तिथून येणारी वाहने एकदम रस्त्यावर येऊ नयेत यासाठी पदपथांची उंची रस्त्यापेक्षा अधिक करण्यात आलेली आहे. परिणामी हे पदपथ गतीरोधकाचे काम करत असले तरी हे काम करताना पावसाळ्यात या ठिकाणी सखल भाग तयार होऊन पावसाचे पाणी साचणार नाही याची कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही.
प्रत्यक्षात हे पदपथ करताना त्याच्याखाली पावसाळी वाहिन्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गल्लीमधील रस्त्यावरून आलेले पाणी रस्त्याच्या कडेचे या पावसाळी वाहिनीपर्यंत जाऊन साचणार नाही, याची खरबरादी घेणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याने पावसाळ्यात या गल्ल्यांमधील रस्त्याच्या सुरुवातीलाच पाण्याची तळी साचत असून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना या पाण्यातून जावे लागत आहे. त्यातच, गल्लीकडे जाणारे रस्ते सिमेंटचे असल्याने पाणीही जमिनीत मुरत नसल्याने साठून राहत आहे.
फिडर पिलरचा धोका…
या रस्त्यावरील पदपथावर अडथळे येऊ नयेत म्हणून महावितरणकडून गल्ल्यांचे रस्ते सुरू होतात तिथे महावितरणचे फिडल पिलर लावले आहेत. मात्र, याच भागात पदपथ आणि रस्त्याच्या उंचीत फरक असल्याने पावसाचे पाणी साचत असून हे पाणी अनेकदा फिडर पिलरच्या आत धोकादायक स्वरूपात जात आहे. परिणामी, पाण्यात वीज प्रवाह उतरण्याचा धोकाही अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसात गल्ली क्रमांक 6 च्या जवळ अशाच प्रकारे फिडर पिलरच्या आत पाणी शिरले होते.