बाजारपेठांचे दार उघडले; आता प्रतिक्षा ग्राहकांची
पुणे – गेले 65 दिवस दुकानाचं कुलूप बघत होतो… आज त्याला चावी लावली… आता गिऱ्हाईक येईल म्हणून थांबलोय… ही प्रतिक्रिया आहे पुण्यातील एरवी गजबजलेल्या पण लॉकडाऊनमुळे सुना बनलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील विक्रेत्याची… शहराची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या लक्ष्मी, कुमठेकर आणि जंगली महाराज रस्त्यावरची अनेक दुकाने बुधवारी उघडली.
आपल्या “लक्ष्मी’ची साफसफाई करण्यात बहुतांश व्यावसायिकांचा वेळ गेला. दुकाने सुरू झाली आता ती गजबजू लागतील अन् शहराच्या अर्थचक्राचा गाडा पुन्हा पूर्ववत् होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
करोनाची लागण भारतात झाली आणि देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे बंद असणाऱ्या शहरातील बाजारपेठा आजपासून सुरू झाल्या. सराफ व्यावसायिकांनीही आज आपले व्यवहार सुरू केले. लॉकडाऊनमुळे गेले 65 दिवसांपासून पुणे शहरातील सर्व व्यवहार बंद होते.
नियम आणि अटींच्या शर्तीवर आता व्यवहारास परवानगी दिली. पालिकेने दुकाने सुरू ठेवण्याचे दिवस ठरवले आहेत. त्याप्रमाणे आज लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, जंगली महाराज रोड, फर्गसन रस्ता या रस्त्यावरील काही दुकाने सुरू झाली होती. दुकानदारांचा आजचा पूर्ण दिवस हा दुकानांच्या साफसफाईत गेला पण आता रोज दुकान उघडल्यावर नक्कीच फरक पडेल आणि त्यामुळे थोडेफार आर्थिक चलन सुरू होईल असे मत काही व्यापाऱ्यांनी प्रभातकडे व्यक्त केले. शहरातील कंटेन्मेंट झोन असणाऱ्या भागातील दुकाने उघडण्यास परवानगी नाही. त्यामुळे शहराचा गजबजलेला पूर्व भाग मात्र बंदच राहिला.
उपनगर व शहराच्या पश्चिम भागातील व्यवसाय सुरू झाले आहेत. शहरातील दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले तरी प्रत्येक दुकानदारांना पालिकेने घालून दिलेले नियम पाळावे लागणार आहेत. दुकानातील प्रत्येकाने मास्क वापरले पाहिजेत. सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा पालन झाले पाहिजे. दुकानातील प्रत्येक कामगारांची थर्मल तपासणी अनिवार्य आहे. या अटींची पूर्तता पहिल्या दिवशीच बहुतांस दुकानदारांनी केली. लक्ष्मी रस्त्यावरील काही कापड दुकाने आणि सराफी पेढ्या सुरू झाल्या. रस्त्यावर गर्दी नसतानाही दुकानदारांनी दुकाने उघडली होती, पण आता बाजारपेठ सुरू झाल्याचे कळल्यावर ग्राहकांची सुद्धा गर्दी वाढेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.
पालिकेने प्रत्येक व्यवसायासाठी वार ठरवून दिले आहेत. त्याप्रमाणे आज कर्वे रस्त्यावरील दुकाने उघडली होती साधारणत: वीस टक्के दुकाने उघडली होती. येत्या दोन दिवसांत ही संख्या आणखी वाढेल. असेच चित्र आहे, असे कर्वे रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित सांगळे यांनी सांगितले. ते म्हणाले, रिटेलची दुकाने सुरू झाली तरी ज्या भागात होलसेल मार्केट अद्याप बंदच आहे. त्यामुळे सध्या दुकानांमध्ये जो माल आहे तो संपला की पुन्हा अडचण येऊ शकते. त्यामुळे होलसेल मार्केटसुद्धा लवकरात लवकर सुरू केल्यास नक्कीच आणखी चालना मिळेल.
शहर आणि उपनगरातील सर्व सराफ दुकाने सुरू झाली आहेत. अजूनही रस्ते वाहतूक सुरू झालेली नाही. ही वाहतूक सुरू झाली की ग्राहक वाढतील. आजच पालिका आयुक्तांना निवेदन देणार आहोत.
– फत्तेचंद रांका, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष