सातारा -सातारा जिल्ह्यातील भारेवाडी येथील दाम्पत्य तसेच म्हासोली व इंदोलीतील प्रत्येकी एका रुग्णाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा आता 170 वर पोहचला आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेले म्हासोली (ता. कराड) येथील 40 वर्षीय निकट सहवासित पुरुष, मुंबई येथून प्रवास करुन आलेला इंदोली (ता. कराड) येथील एक 39 वर्षीय पुरुष व ठाणे येथून प्रवास करुन आलेले भारेवाडी येथील दाम्पत्य वय वर्षे 52 व 43 अशा एकूण 4 जणांचा अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या 170 झाली आहे. त्यापैकी 69 जण उपचार घेत आहेत. 98 जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी दि. 19 मे रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार सातारा जिल्ह्यात मुंबई, ठाणे व इतर भागातून प्रवास करुन आलेले सातारा तालुक्यातील वारणानगर येथील 3, वर्णे व रायगाव पोखरी येथील प्रत्येकी 1, कोरेगाव तालुक्यातील न्हावी व वेळू येथील प्रत्येकी 1, खंडाळा तालुक्यातील अहिरे व अजनुज येथील प्रत्येकी 1, जावळी तालुक्यातील वरोशी गावातील 1, खटाव तालुक्यातील मायणी व आवळे पठार येथील प्रत्येकी 1, पाटण तालुक्यातील बनपुरी व शिरळ येथील प्रत्येकी 1, कराड तालुक्यातील म्हासोली येथील 4, खालकरवाडी चरेगाव येथील 1 व शामगाव येथील 1 अशा एकूण 20 नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये 19 ते 70 वर्षे वयोगटातील 15 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे.