पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी ३९ वी सेट परीक्षा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. नेट परीक्षेप्रमाणेच सेट परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, उपलब्ध कालावधीचा विचार करून विद्यापीठातर्फे एप्रिल महिन्यात होणारी सेट परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. मात्र, सन २०२५ मध्ये घेण्यात येणारी ४० वी सेट परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तसेच या परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. याबाबत विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १९९५ पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. ही परिक्षा ३२ विषयांसाठी घेण्यात येते. १७ शहरांमधील जवळपास २६२ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठीच्या अर्जाची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर होणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले. शेवटची सेट परीक्षा याच वर्षी २३ मार्चला झाली होती. यात जवळपास सवा लाख विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.