फलटण – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करावे, असे आवाहन आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. आगामी निवडणुकांसाठी मतदारयादीत आपले व आपल्या कुटुंबातील सर्वांची नावे बिनचूक व फोटोसह असल्याची खात्री मतदारांनी करून घ्यावी, आवश्यक तिथे दुरुस्ती करुन घ्यावी. कुटुंबातील मुलामुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल, तर त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करुन घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
रामराजे म्हणाले, सक्षम लोकशाहीची पहिली पायरी म्हणून मतदार नोंदणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरु केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण अभियानास प्रतिसाद द्यावा. आपला प्रभाग, वाडीवस्ती, गाव आणि शहरातील मतदारयादी अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांचे माजी सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्यामार्फत हे काम सुरू आहे. दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अथवा झाली आहेत, त्यांनी नमुना नंबर 6 भरुन आपले नाव मतदारयादीत नोंदवून घ्यावे.
या पुनरीक्षण कार्यक्रमात 2 व 3 डिसेंबर रोजी दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर, भटक्या विमुक्त जातीजमातीच्या व्यक्तींसाठी विशेष शिबिर प्रत्येक गावात मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तेथे आपल्या भागातील या मतदारांची नोंदणी करुन घ्यावी. या पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी, मतदार नोंद दुरुस्ती, मतदारयादीतून नाव वगळणे यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सर्वांना सहकार्य करतील. याशिवाय व्होटर हेल्पलाइन, मोबाइल अॅप, व्होटर पोर्टल या संकेतस्थळावरून घरबसल्या हे कामकाज ऑनलाइन करता येईल, असे रामराजे यांनी सांगितले.