कोल्हेंनी सरकारला धरले धारेवर : कंत्रादारावर कारवाई करा
निमोणे – आंबळे येथील बाळंतीण शिद्यातील आहाराची चौकशी करा, अशी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवरच असल्यामुळे प्रशासन वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे नेमकं कोणाचं पोषण सुरु आहे, हा प्रश्न आहे. गरोदर मातांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यासापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरु असल्याची टीका करीत अशा कंत्राटदारांवर कारवाई करा, असा आक्रमक पवित्रा कोल्हे यांनी घेतला आहे.
शिरुर तालुक्यातील आंबळे गावात पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून बाळंतीण शिध्यात अळ्या व सोनकिडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार (दि 12) रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणामुळे शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. खासदार कोल्हे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
बाजारातून एक्सप्राइरी डेट जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा अशी साखळी समोर येत आहे. त्यामुळे हे नेमकं पोषण कोणाचं कंत्राटदाराच की गरोदर माता आणि पोटातल्या बाळाचं असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही कोल्हेंनी केली आहे.
प्रभातने उठवला सर्वप्रथम आवाज
शिरुर तालुक्यातील आंबळे गावात पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून गरोदर मातांना देण्यात आलेल्या पोषण आहारात गूळ, खारीक, काजू यात अळ्या आणि सोनकिडे आढळून आल्याने आंबळे येथील एका महिलेच्या पतीने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर “दै. प्रभात” ने सर्वप्रथम याची दखल घेत वृत्त प्रसिद्ध करीत यावर आवाज उठवला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे यांनी आंबळे (ता. शिरुर) येथे अंगणवाडीत जाऊन पोषण आहाराचा तक्रारदार महिलेच्या समक्ष पंचनामा केला. त्यानंतर हा आहार ताब्यात घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार असून त्याचे रिपोर्ट आल्यानंतर संबधित ठेकेदार दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे निर्मला चोभे यांनी ‘दै.प्रभात’ शी बोलताना सांगितले.