नारायणगाव – जुन्नर तालुका हा बिबट्यांचे माहेरघर झाल्याने या दररोज त्याचे पाळीव प्राणी तसेच माणसांवर हल्ले होत आहेत. भक्षाच्या शोधात बिबटे खुलेआम मानवी वस्तीमध्ये फिरत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.
जुन्नर वनविभागातील बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी वनविभागाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नारायणगाव रस्त्यावरील साईबाबा मंदिर परिसरात दरंदळे मळ्यात तीन बिबटे एकाच वेळी रस्त्यावरून मध्यरात्री फिरत असल्याचे चित्र सीसीटीव्ही’त कैद झाले आहे. तर अशा घटना जुन्नर तालुक्यात दररोज घडत असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.