पुणे – कसबा विधानसभा मतदार संघाचा विकास निधी पर्वती विधानसभा मतदारसंघात वळवल्याचा आरोप कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी केला. हा निधी परत द्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. अन्यथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर या आठवड्यात धरणे आंदोलन करणार असून, ते दिसतील तेथे निदर्शने करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला.
यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, शिवसेनेचे विशाल धनवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश नलावडे, आप्पा जाधव उपस्थित होते. “कसब्यातील सुविधा आणि विकासकामांसाठी उपलब्ध निधी अचानकपणे पर्वतीतील कामांसाठी वळवण्याचा प्रकार झाला आहे. स्व. मुक्ता टिळक यांनी ही कामे प्रस्तावित केली होती. ती निविदा प्रक्रियेपर्यंत आली असतानाच ते रद्द करून हा निधी वळवला आहे. महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.
रस्ते, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ, विसर्जन घाट, उद्यान विकास अशी जवळपास 100 विकासकामे प्रस्तावित होती. 20 डिसेंबर 2022 रोजी नगर विकास विभागाचा निर्णय झाला होता. परंतु, 27 जुलै 2023 रोजी शासन निर्णय शुद्धीपत्रक काढून हा निधी कसबा मतदारसंघातील कामांऐवजी पर्वती मतदार संघामध्ये वळवण्यात आला,’ असे धंगेकर म्हणाले.
अजितदादा “इनोसंट’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात बैठक घेतली आणि जवळपास सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ही तक्रार त्यांच्याकडे का नाही केली, असे विचारले असता आमदार धंगेकर म्हणाले, “अजितदादा इनोसंट आहेत. त्यांना यातले काहीच माहिती नाही. त्यांचा विकासाला कधीच विरोध नसतो. हे कारस्थान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच केले आहे.’