पुणे – बेसुमार प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुळा-मुठा नद्या लवकरच पुन्हा जिवंत होणार आहे. शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्के शुद्ध करून नदीत सोडण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी शुद्धीकरण कामाला सुरूवात झाल्याने केंद्र शासनाने समाधान व्यक्त केले आहे.
नदी शुद्धीकरण कामाचा वेग आणखी वाढवून जास्तीत जास्त निधी खर्च करावा, अशा सूचना केंद्रीय वित्त विभागाने आढावा बैठकीत महापालिकेस केल्या आहेत. दरम्यान या योजनेत 11 सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातील दहा प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. तर पहिला प्रकल्प पुढील वर्षभरात प्रत्यक्षात सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
शहरातील मुळा-मुठा नदीतील सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या माध्यमातून जपानच्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) 841 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. हा प्रकल्प एकूण 1,473 कोटी रुपयांचा असून उर्वरित खर्च महापालिका करणार आहे. या प्रकल्पास 2015 मध्ये मान्यता मिळालेली आहे. मात्र, प्रत्यक्षात दीड वर्षांपूर्वी काम सुरू झाले आहे. या प्रकल्पात 30 टक्के बांधकाम तर 70 टक्के यंत्रसामग्री आहे.
या निविदा पूर्ण झाल्या असून, त्या तयार करण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे महापालिका 10 सांडपाणी केंद्राचे बांधकाम आधी पूर्ण करणार असून जानेवारीपर्यंत यंत्रसामग्री मिळण्यास सुरूवात होणार आहे. आतापर्यंत एकूण 215.14 कोटी रुपयांची कामे झाली आहे. त्यापैकी ठेकेदाराला 165 कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून मंजूर अनुदानापैकी 170 कोटी रुपये मिळाले असून, ते पूर्णपणे खर्च झाले आहेत.
नदी शुद्धीकरणासाठी निधी खर्ची पडण्याचे प्रमाणही कमी असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पात 30 टक्के काम हे सिमेंट कॉंक्रीटचे आहे. उर्वरित 70 काम हे प्रकल्पांमध्ये यंत्रसामग्री बसविणे, सांडपाणी वाहिनी टाकणे असे आहे. त्यामुळे कॉंक्रीटचे काम पूर्ण होताच, इतर कामांना गती येणार असल्याची ग्वाही महापालिकेने दिली आहे.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, मनपा
1,473 कोटी रु. – नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा एकूण खर्च
841 कोटी रु -‘जायका’कडून मिळणारे अनुदान