पुणे- राज्यातील 1 हजार 443 केंद्रांवर रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. या परीक्षेला 4 लाख 68 हजार 948 उमेदवार बसणार आहेत. अधिकाऱ्यांच्या पथकांचा परीक्षावर वॉचही राहणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही उमेदवारांना लांबच्या परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी मोठी कसरतच करावी लागली आहे.
जानेवारी 2020 नंतर आताच “टीईटी’ परीक्षा होत आहे. विविध प्रकारचे विघ्न दूर करुन अखेर आता परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अखेर परीक्षा घेण्यासाठी निश्चित मुहूर्त सापडला आहे. पेपर क्रमांक 1 हा सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून यासाठी 2 लाख 54 हजार 428 उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे.
पेपर क्रमांक 2 हा दुपारी 2 ते 4.30 या वेळेत होणार आहे. पेपर क्रमांक 1 साठी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 21 हजार 225 तर पेपर 2 साठी 18 हजार 865 उमेदवार बसणार आहेत. सिंधुदुर्गमध्ये पेपर क्रमांक 1 साठी सर्वात कमी 1 हजार 447 तर पेपर क्रमांक 2 साठी 1 हजार 269 उमेदवार नोंदणी झालेली आहे.
एका परीक्षा केंद्रात किमान 150 तर कमाल 1 हजार 200 उमेदवारांच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, आयुक्त तुकाराम सुपे, उपायुक्त हारुन आतार, शैलजा दराडे, अधीक्षक शशिकांत चिमणे आदींनी अनेकदा बैठका घेऊन परीक्षेसाठी विशेष नियोजन केले आहे.