पिंपरी -गोवा राज्याच्या मुक्तीसंग्रामला 62 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या 62 सायकल स्वारांनी पुणे ते गोवा अशी 4 दिवसांची गोवा स्वतंत्रता सायकल मोहीम अर्थात कोस्टल राईड यशस्वीपणे पूर्ण केली.
शनिवारी (दि. 3 ) पहाटे चार वाजता उद्योजक अण्णा बिरादार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रकाश शेटबाळे, इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. या सायकल मोहिमेत पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी सहभाग घेतला होता.
प्रवासाचा मार्ग पुणे ते कराड, आजरा आणि गोवा असा होता. प्रवासातील 465 किलोमीटरचे अंतर सहभागी सायकलस्वारांनी पार केले. उंब्रज येथे सचिन निकम, संतोष बाबर, गौरव कारंडे, रणजीत शिंदे यांचातर्फे सर्व सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले. कराड येथे मुक्काम केला. सैदापूर येथील सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी कराड व परिसरातील अकरा मारुती व इतर असलेल्या ऐतिहासिक वारसा बद्दल माहिती दिली. कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी आजरा येथे मुक्काम होता. तर, गोवा येथे गोवा राज्याचे मंत्री सुभाष फळदेसाई तसेच पराग आचरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. महाराष्ट्रातून गोवा मुक्ती संग्रामासाठी 60 वर्षांपूर्वी बऱ्याच जणांनी बलिदान दिले व आज पुणे येथून एवढी मोठी राइड आयोजित केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले व परतीचा प्रवास झाला.