नगर – महिलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी जिल्हास्तरावर पाच कोटींचे महिला प्रशिक्षण भवन उभारण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिला बचगटांनी उत्पादीत केलेल्या मालाची ऑनलाईन विक्री होण्यासाठी जिल्ह्याचा एक ब्रॅंड तयार करण्याचा प्रयत्न असून देशभरात तो नावारुपास आणण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषिविभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशुप्रदर्शन 2023 चे उदघाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे कृषी उपसंचालक (आत्मा) राजाराम गायकवाड आदी उपस्थिती होती.
मंत्री विखे म्हणाले की, पौष्टिक तृणधान्याला जागतिकस्तरावर नेण्यासाठी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन घेऊ जिल्हा राज्यात तृणधान्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर रहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर शासनाने भर दिला असून बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला एक व्यासपीठ मिळावे. यादृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर महोत्सवात महिलाबचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी 300 स्टॉल उभारण्यात आले आहेत. महिलाबचतगटांनी उत्पादित केलेला माल विक्री करता यावा यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 2 कोटी रुपये खर्चून बचतगटातील महिलांना विक्रीस्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले असुन येणाऱ्या काळातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, कृषी, पशु व बचतगट असे सर्वसमावेशक 570 स्टॉल असलेल्या भव्य प्रदर्शनाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्हावी, यासाठी मोफत सवरुपात सर्वाधिक स्टॉल्स बचतगटांना उपलब्ध करुन देण्यात आले असुन जिल्हा वार्षिक योजनेतूनही या गटांना माल विक्री स्टॉल्स देण्यात आले. सुत्रसंचलन बेडेकर यांनी केले तर आभार पोपटराव पवार यांनी मानले.