Maharashtra Legislative Council Elections: राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता राज्य विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. 7 जुलै रोजी या चारही मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. 26 जून रोजी या जागांसाठी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
वास्तविक या आधी देखील या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, शाळांना सुट्टी असल्याने या निवडणुकीवर परिणाम होईल, अशी शंका अनेक शिक्षक संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. आता 15 जूननंतर शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विधान परिषदेमध्ये असलेल्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य हे शिक्षक मतदार संघातील तर 7 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. यातील दोन पदवीधर मतदारसंघातील आणि दोन शिक्षक मतदार संघातील आमदारांचा कार्यकाल 7 जुलै रोजी संपत आहे.
असा आहे नवा निवडणूक कार्यक्रम
31 मे 7 जून उमेदवारी अर्जाची मुदत
10 जून अर्जाची छाननी
12 जूनपर्यंत उमेदवारी परत घेण्याची मुदत
26 जून प्रत्यक्ष मतदान
1 जुलै मतमोजणी प्रक्रिया
या आमदारांचा कार्यकाळ संपणार –
दरम्यान, 7 जुलै 2024 रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.