Pune Porsche Car Accident Case: भरधाव वेगात पोर्शे कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील, कोझी व ब्लॅक पबचे मालक आणि कर्मचारी यांची शुक्रवारी (ता.२४) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी वाढून देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र त्यांची मागणी ना मंजूर करून न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे आरोपींच्या वकिलांनी जामीनसाठी अर्ज केला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (ता. २४) त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली असल्याचे चालकाने त्याच्या जबाब सांगितले असल्याची माहिती बुधवारी (ता. २२) पोलिसांनी न्यायालयास दिली होती. ब्लॅकमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचेही पोलिस तपासातून पुढे आले आहे.बेदरकारपणे कार चालविणाऱ्या मुलासह इतर अल्पवयीन मुलांना पबमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही पब मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अग्रवाल यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे सायबर तज्ञांच्यासमोर विश्लेषण करायचे आहे. त्यामुळे अग्रवाल यांच्या पोलिस कोठडीत वाढ करणे गरजेचे आहे. तपासातून समोर आलेल्या मुद्द्यांचा सखोल तपास करण्यासाठी इतर आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला. आरोपींच्यावतीने ॲड. एस. के. जैन, ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे, ॲड. अमेय गोऱ्हे आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.