पिंपरी – पुणे शहरातील कोयता गॅंगची दहशत शमल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरात अल्पवयीन मुलांच्या कोयता गॅंगने उच्छाद मांडला आहे. एकाच दिवशी अडीच तासांत तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोयता, तलवार अशा शस्त्रांचा धाक दाखवत तीन ठिकाणी लूटमार केल्याच्या घटना घडल्या. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनने या टोळीतील तिघांना ताब्यात घेतले आहे. मिसरूडही न फुटलेल्या मुलांनी तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
सहा जणांनी दुचाकीवरून येऊन कुऱ्हाड, तलवार अशी शस्त्रे घेऊन एकापाठोपाठ तीन ठिकाणी दहशत माजवत लूटमार केली. गुन्हे शाखा युनिट दोनने समांतर तपास सुरू केला आहे. तिन्ही घटनांमधील आरोपी एकच असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांना मिळाली. त्यानुसार तपास करत पोलिसांनी परशुराम वामन घोलप (वय 18, रा. मोरेवस्ती, चिखली) याला आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे प्रकार आणखी तिघांसोबत मिळून केले असल्याचे सांगितले.
6 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता नेवाळे वस्ती, चिखली येथील रूपेश्वर सुपर मार्केट या दुकानात टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून कॅश काउंटरच्या ड्रॉवरमधून पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पिंपरी येथील घटनेनंतर त्या टोळक्याने रात्री पावणे बारा वाजता एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील बेल्जीयम वॉफल्स कंपनीच्या स्टोअरमध्ये तलवारी व हत्यारे घेऊन दहशत माजवत तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
चिखली येथील घटनेनंतर त्या टोळक्याने रात्री सव्वा अकरा वाजता मासुळकर कॉलनी पिंपरी येथे चायनीज हॉटेलमध्ये टोळक्याने कोयता, कुऱ्हाड, तलवार घेऊन कामगारांना शिवीगाळ, धमकी देत दहशत निर्माण केली. टोळक्याने हॉटेलच्या ड्रॉवरमधून दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी मोहीम संपवली अन्…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात राबवलेली मोहीम नुकतीच संपली. मोहीम संपल्यानंतर पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन यातील विजेत्यांचे अभिनंदन केले. पोलिसांचा कौतुक सोहळा संपतो न संपतो तोच दुसऱ्या दिवशी अवैध शस्त्रे बाहेर निघाली. टोळक्याने अडीच तासात तीन ठिकाणी शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करत लूटमार केली. शहरात तरुणांच्या हातात शस्त्र कुठून येतात. याचा शोध घेऊन त्याच्या मुळापर्यंत जात त्याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा ही मुले पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरु शकतात.