पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामाला गती आलेली असल्याने या रस्त्याचे काम त्वरेने पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर कान्हा-हाॅटेल ते खडीमशीनपर्यंत स्मशानभूमीच्या कडेने अरूंद रस्ता असल्याने तसेच चढ असल्याने मोठ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते.
परिणामी खडीमशीन चौकातही वाहतूक कोंडी होते. आता ही कोंडी लवकरच फुटणार असून खडी मशिन चौक ते कान्हा हॉटेल परिसरादरम्यान येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र मार्गिका केल्या जाणार आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजे एक जानेवारीपासून (सोमवार) हा बदल केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
त्यामुळे, खडीमशीन चौकातून कात्रजकडे जाण्यासाठी भूसंपादन झालेल्या जागेवरून तर कात्रज कडून खडीमशीन चौकाकडे जाण्यासाठी कान्हा हाॅटेल समोरून दोन स्वतंत्र लेन असणार आहे. कान्हा हॉटेल परिसरातील चौकात भूमिगत रस्त्याचे (अंडरपास) काम करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करावे लागेल. परंतु, सध्या येथे दुहेरी वाहतूक असल्याने वाहतूक सुरू ठेवून हे काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाहतूक मार्गामध्ये बदल करावा लागणार आहे, असे ढाकणे यांनी सांगितले.
कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामातील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खोदकाम पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यामध्ये येथील काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांना कळवण्यात आले असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.