पिंपरी – अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने दि. १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत शहरातील घरोघरी जावून श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या मंगल अक्षता वितरण करण्यात येणार आहे. शहरासह देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, हिंजवडी ग्रामपंचायत परिसरात हे निमंत्रण महाअभियान होणार आहे.
समितीचे शहर संयोजक धनंजय गावडे, सहसंयोजक महेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषद पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी ही माहिती दिली. अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व देशभरातील धार्मिक, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, साहित्य आदी विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील देखील मान्यवरांचा समावेश आहे.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संस्थान देहू, माऊली संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, मोरया गोसावी मंदिर चिंचवड, इस्कॉन मंदिर रावेत, संत गजानन महाराज मंदिर सांगवी येथे कलश पूजानाने या उपक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे २५०० स्थानी अक्षता पूजनाचे कार्यक्रम, कलश यात्रा संपन्न झाल्या. यामध्ये साधारण आठ लाखांवर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कलशाचे दर्शन घेतले. असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
१ ते १५ जानेवारी २४ दरम्यान गृहसंपर्क अभियान संपन्न झाल्यानंतर २२ जानेवारी रोजीपर्यंत शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, संगीत, नृत्यकलासह विविध कलांचे कार्यक्रम, सोसायट्या, वाड्या वस्त्या, कॉलनी, प्रतिष्ठाने, मंडळांमध्ये रामसंकीर्तन होणार आहे. या आनंदोत्सवात बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.