पुणे – शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू

ऑनलाइन पद्धतीद्वारे होणार बदली : 25 ते 30 मे दरम्यान अर्ज भरण्याची मुदत

पुणे – जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदावर्षी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने सर्व बदल्या होणार आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांना येत्या 25 मे पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर 25 ते 30 मे दरम्यान शिक्षकांना अर्ज भरण्याची मुदत देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेकडून बदलीप्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या याद्या पूर्ण करण्याच्या सूचना शासनाकडून यापर्वीच देण्यात आल्या आहेत. ती सर्व माहिती दि. 25 मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये मागील वर्षी चुकीची माहिती भरून बदली झालेल्या शिक्षकांची विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यामध्ये अशापद्धतीने गतवर्षी बदली झालेल्या शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्यास त्यांची बदली करण्याच्या सूचना केल्या आहेत.

शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत 8 मार्च 2019 रोजी शासनाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले होते. बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा यांच्या याद्या घोषित करणे व त्यांची नोंदणी संगणक प्रणालीवर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यास लोकसभा निवडणुकाची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी सं.ना.भंडारकर यांनी बदल्यांची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

गतवर्षीची प्रक्रिया गाजली होती
गतवर्षी अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याने भरतीप्रक्रिया चांगलीच गाजली. चुकीचे अंतर, सुगम-दुर्गम, तीन वर्षांचा कालावधी अशी अनेकांनी चुकीची माहिती ऑनलाइन प्रक्रियेमध्ये भरली होती. त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीनंतर कारवाई करण्यास सूचना केल्या होत्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.