पुणे -पिंपरी-शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे कॉलेज-रूबी हॉल रुग्णालय हे मेट्रोमार्ग दि. 1 मेपर्यंत सुरू होऊ शकतील, असे महामेट्रो प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत म्हटल्याची चर्चा होती. परंतु, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून पाहणी सुरू असून सुमारे अहवालास 5 ते 6 दिवस लागणार आहेत. तसेच त्यानंतरच्या शासकीय प्रक्रियेमुळे या मार्गावरील मेट्रो सुरू होण्याकरिता पुणेकरांना जून महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोचे दोन विस्तारित मार्ग दि. 1 मे रोजी सुरू करण्याचा मुहूर्त अखेर महामेट्रोलाही गाठता आला नाही. पुणे ते पिंपरी-चिंचवड यामध्ये दोन विस्तारित माग आहेत. फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय हा आठ कि.मी.चा विस्तारित मार्ग असून यावर बोपोडी, दापोडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय ही पाच स्थानके असणार आहेत. तर, गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल रुग्णालय हा सात कि.मी.च्या विस्तारित मार्गावर डेक्कन, संभाजी उद्यान, महापालिका भवन, मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्टेशन आणि रूबी हॉल रुग्णालय अशी सहा स्थानके आहेत.
या दोन मार्गांची पाहणी “सीएमआरएस’ करणार असून यामध्ये मेट्रो मार्ग, ओव्हरहेड केबल्स, सिग्नल यंत्रणा, मेट्रोच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती, अग्निशमन यंत्रणा, स्थानके आणि प्रवासी सुरक्षितता याचा समावेश आहे.
कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून या दोन्ही मार्गांच्या मेट्रोच्या कामाची पाहणी झाल्यावर ते प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र महामेट्रोला मिळणार आहे, याची माहिती महामेट्रोकडून राज्य सरकारला कळविण्यात आल्यानंतर शासनाकडून मंजुरी आल्यावर या मार्गाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होईल आणि त्यानंतर प्रवासी वाहतुकीला मुहूर्त मिळणार आहे.
फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे काम पूर्ण झाले आहे तसेच गरवारे कॉलेज-रूबी हॉल रुग्णालय मार्गाची पाहणीी “सीएमआरएस’कडून सुरू आहे. त्यांच्याकडून आलेला अहवाल तसेच त्यानंतर राज्य सरकारच्या परवानगीच्या प्रमाणपत्रानंतर हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले होऊ शकतील.
– हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो