आठवड्याला तयार व्हायचे 30 ते 50 किलो मेफेड्रोन
“ससून’मधील “ललित’कथा
पुणे – ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ड्रग माफिया ललित पाटीलच्या कंपनीची कार्यपद्धती पोलिसांनी उलगडली आहे. त्याच्या कंपनीत आठवड्याला 30 ते 50 किलो मेफेड्रोन तयार होत होते. याची आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 30 ते 50 कोटी इतकी किंमत होते. हे उत्पादन 2019 पासून सुुरू होते. कंपनीत उत्पादनाचे काम भूषण पाटील बघायचा तर वितरणाचे काम अभिषेक बलकवडे करत होता. मार्केटिंगची जबाबदारी ललितवर होती. त्यांचे देशभर विक्रीचे नेटवर्क होते. त्या माध्यमातून ललित दररोज आपला ठावठिकाणा बदलत फिरत आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना बुधवारी अटक केली. तर ललितच्या शोधासाठी अद्यापही गुन्हे शाखेची दहा पथके कार्यरत आहेत. तो नेपाळच्या दिशेने मात्र पळून गेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून पाटीलचा कारखाना उद्ध्वस्त केला. तेथून 300 कोटीचे मेफेड्रोन जप्त केले.
ललित भलताच आंबट शौकीन
ललित पाटीलकडे अंमली पदार्थ सापडल्यावर त्याची घरझडती घेतली. यामध्ये आठ पेनड्राईव्ह सापडले. त्यामध्ये वेबसिरीज खच्चून भरल्या होत्या, त्याही अश्लिल कंटेंट असलेल्या.
तीन किलोपेक्षा अधिक सोने जप्त…
ड्रग माफिया ललित आणि भूषण पाटील यांनी ड्रग विक्रीतून आलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून ठेवल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या हाती तीन किलोहून अधिक सोने लागले आहे. भूषण आणि अभिषेक या दोघांना अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथून पोलिसांनी हे सोने जप्त केले आहे.
दरम्यान, कोर्टात पोलिसांनी संशय व्यक्त करताना ड्रगच्या आलेल्या पैशातून त्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी केली असल्याचे म्हटले होते. तर, अवैध मार्गातून मिळविलेल्या पैशातून पाटील बंधूंनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्याचे आता समोर आले आहे.
ललित पाटीलचा कसून शोध घेण्यात येत आहे. तर अटक आरोपींकडून अद्यापही कोणतीच महत्त्वाची माहिती मिळाली नाही. मात्र, त्यांच्या तपासात नक्कीच महत्त्वाचे धागेदोरे सापडतील.
-अमोल झेंडे, उपायुक्त (गुन्हे).