पुणे – अपघाताचा बहाणा करत संभाजीनगर येथील एका कारचालकास रिक्षा चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी लूटले. ही घटना सेव्हन लव्हज चौकात रात्री पावणे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अब्युल खान (27,रा.संभाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार एका टुर कंपनीत कामाला असून त्यांची स्व:तची इटिओस कार आहे. ते मित्राला एअरपोर्टवर सोडण्यासाठी संभाजीनगरवरुन पुण्यात आले होते. जाताना त्यांना मित्राच्या आई-वडिलांना घेऊन संभाजीनगर येथे जायचे होते. त्याप्रमाणे ते रात्री पावणे तीनच्या सुमारास स्वारगेट येथे मित्राच्या आई वडिलांना घेण्यासाठी निघाले होते. त्यांची कार सेव्हन लव्हज चौकात येताच समोरील रिक्षा चालकाने करकचून ब्रेक दाबला. यामुळे कार रिक्षाला धडकली.
रिक्षा चालकाशी किरकोळ वाद झाल्यावर त्यांनी त्याला फोन पेवर चार हजार रुपये दिले. यानंतर लगेचच मागून दुचाकीवर तीघे जण आले. त्यांनी हे आमचे चाचा आहेत, आम्हाला सुध्दा पैसे दे म्हणत झटापट केली. यानंतर मारहाण करत कारची चावी काढून घेतली.
यावेळी एकाने हात पकडून खिशातील 20 हजाराची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. यानंतर ते गाडीवरुन पळून गेले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग करत आहेत.