पुणे, दि. 12 -शहरात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पदपथ उभारले आहेत. शहराच्या अनेक भागांत नागरिक सकाळी या पदपथांचा चालण्यासाठी वापर करतात. मात्र, त्यावेळी शहरातील अनेक नागरिक पाळीव श्वानांनाही फिरण्यासाठी घेऊन येतात. हे श्वान पदपथ तसेच भर रस्त्यातच घाण करतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अस्वच्छता करणाऱ्या श्वान मालकांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य निरिक्षकांना शहरात रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडून अशा प्रकरची पहिलीच कारवाई करण्यात आली असून, सहा ते सात श्वानमालकांकडून अस्वच्छते प्रकरणी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईचे सकाळी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक श्वान पाळतात. त्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. हा परवाना घेतानाच श्वान सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, याचीही अट घालण्यात आलेली आहे. मात्र, शहरात जवळपास एक लाखाच्या आसपास पाळीव श्वान असतानाही केवळ पाच हजार नागरिकांनीच परवाने घेतलेले आहेत. यातील अनेक नागरिक सकाळच्या वेळेत घरातील श्वानांना बाहेर फिरण्यास आणतात. हे श्वान रस्त्यावर अथवा पदपथावरच घाण करतात. यावेळी नागरिकांनी काही आक्षेप घेतल्यास वादाचे प्रसंगही होतात. मात्र मालकांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे महापालिकेकडे याबाबत तक्रारी येत असल्याने तसेच मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनीही या प्रकाराबाबत तक्रारी केल्याने पालिकेने अखेर अशा अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड
सर्व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, रस्त्यावर श्वानांनी घाण केल्याचे आढळल्यास प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच याबाबत क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई सुरू करण्यात आलेली असून, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक यांना संपूर्ण शहरात सकाळी ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.