पुणे -जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापक कर्मचाऱ्याला लाचलुपत विभागाच्या पथकाने पकडले. प्रशांत मोहन कांबळे (भूकरमापक वर्ग-3) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. कार्यालयाच्या आवारात पथकाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी कांबळे याच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 53 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी शिरुर भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी आरोपी कांबळे याने त्यांच्याकडे जमीन मोजणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मोबदला म्हणून मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचत विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारीची सोमवारी खातरजमा केली असता, कांबळे याने लाच मागितल्याचे समोर आले.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने सोमवारीच सापळा लावला होता. त्यावेळी पाच हजारांची लाच घेताना कांबळेला पथकाने पकडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.