पुणे – करोना अनाथांसाठी “सुप्रियां’ची “जीवलग’

पुणे – करोनाच्या साथीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना दत्तक घेणारी जीवलग योजना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जाहीर केली. या प्रकल्पाची सुरवात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कल्याण निधी मार्फत करण्यात येणार आहे.

आपले जीवलग गमावलेल्यांच्या आयुष्यता निर्माण झालेली पोकळी जीवलग बनून भरून काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यामातून करण्यात येत आहे. या 450 करोना अनाथांची जबाबदारी 450 व्यक्तींकडे सोपवण्यात येणार आहे. त्यांना राष्ट्रदूत म्हणून गौरवण्यात येणार आहे.

हे राष्ट्रदूत या मुलांशी बोलतील. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. त्याचा तपशील पक्षाला सादर करतील, असे सुळे यांनी स्पष्ट केले. या शिवाय करोना निराधारांची माहिती जिल्हा प्रशासनाकडूनही गोळा करण्यात येत आहे. त्याच्या सहाय्याने करोना अनाथांसाठी एक व्यापक योजना राबवण्यात येणार आहे.

त्याचा अधिकृत तपशील सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या अधिकृत पेजवर जाहीर करण्यात येणार आहे.अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी जीवलग योजना जाहीर करून त्यांना एक सुंदर भेट दिली आहे. लहान मुलांना वाचवण्यापेक्षा करोनाच्या साथीत दुसरी कोणती मोठी भेट असू शकते? अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

==================

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.