पुणे – गिर्यारोहण संस्था “गिरीप्रेमी’च्या 40 व्या वर्षपूर्तीनिमित्त गिर्यारोहकांनी सह्याद्री पर्वतरांगांतील 25 सुळक्यांवर गेल्या दोन आठवड्यांमध्ये चढाई करण्यात संघाच्या विविध संघांनी यश मिळविले.
एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखालील संघाने रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सुधागड, पाली, सरसगड, चंदेरी, बदलापूर, पालघर इत्यादी ठिकाणी असलेल्या विविध सुळक्यांवर आरोहण केले. यांत 50 ते 250 फूट उंच असलेल्या सुळक्यांचा समावेश होता. मोहिमेदरम्यान संघ सदस्यांनी अतिशय दुर्गम भागात वसलेल्या सुळक्यांची निवड केली होती. या संघात सचिन शाह, राजेंद्र मोरे व ओंकार बुर्डे यांचा समावेश होता.
चढाईचा नवीन मार्ग शोधणे. मार्गातील निखळणारे दगड, अंगावर येणारे कडे, निसरडी माती, दोर लावण्यासाठी कमी उपलब्ध जागा अशा नैसर्गिक आव्हानांचा सामना केला. कोरडे व उष्ण हवामान यांचा देखील अडथळा पार करत संघाने सुळक्यांवर चढाई केली. आतापर्यंत ढोकले यांनी 100 सुळक्यांवर यशस्वी चढाई करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
याच सोबत गिरीप्रेमीच्या दुसऱ्या संघाने नाशिक जवळील डांग्या सुळक्यावर यशस्वी चढाई केली. या संघात डॉ. सुमित मांदळे, भूषण शेट, वरूण भागवत व रोहन देसाई यांचा समावेश होता. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहक आव्हान स्वीकारत आहेत. येत्या काळात 40 सुळक्यांवरील आरोहण पूर्ण करण्याचे ध्येय संस्थेने ठेवले आहे.