कराड – शहरातील टाऊन हॉल, बापूजी सांळुखे पुतळ्यानजीक असणाऱ्या वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याने 25 घरे जळून खाक झाली. या आगीमुळे गॅसच्या तीन सिलिंडरचा स्फोट होऊन आगीने आणखीनच रौद्ररूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी हानी झाली आहे. या घटनेत दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली. कराड नगरपालिका तसेच कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
या वस्तीत आग लागण्याची गेल्या दहा वर्षातील ही तिसरी घटना असून यापूर्वीही आग लागून जीवित व वित्तहानी झाली होती. त्यावेळी अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे या वेश्या वस्तीत एकच खळबळ उडाली. अनेक महिला, लहान मुले आक्रोश करीत सुरक्षितस्थळी पळत होती. अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण
केल्याने आग आटोक्यात आली. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत सूचना केल्या. तत्पूर्वी माजी नगरसेवक फारूख पटवेकर, विजय यादव यांनी घटनास्थळावर आग विझवण्यासाठी कार्यकर्त्यांसह मोठी मदत केली. अनेक घरातील साहित्यही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
कपडे, दागिने व पैसे जळून खाक
या वस्तीतील एका महिलेच्या मुलीचे लग्न होणार असल्याने कुटुंबीयांनी कपडे, दागिने व पैशांची व्यवस्था केली होती. मात्र, रात्री लागलेल्या आगीत सर्व साहित्य, दागिने व पैसे जळाल्याने महिलेने आक्रोश व्यक्त करीत मदतीची अपेक्षा व्यक्त केली.