पुणे – पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक राहूल राणे यांचे वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी मुंबईत एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या महिन्यात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते पण तब्येत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, बहिणी, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांना काहीच महिन्यांपूर्वी बालेवाडी येथे महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा २०२०-२१ सालचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते.
#FIHProLeague24 : प्रो लीगसाठी भारतीय हाॅकी संघाची घोषणा; हरमनप्रीतकडे कर्णधारपदाची धुरा…
एल एक्स टी या प्रतिथयश स्केटिंग साहित्याचे निर्माते व संस्थापक, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारे स्केटिंग व सायकलिंगचे प्रशिक्षक -मार्गदर्शक, खेळाबरोबरच मुलांमध्ये मूल्य शिक्षणाची जोपासना करणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून राहूल राणे यांची ख्याती होती.