Pune Porsche accident | Devendra Fadnavis : पुण्यातील दुर्घटनेचे राजकारण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे, ती सर्व कारवाई पोलिसांनी उघडपणे केली आहे. इतकेच नाही तर बाल हक्क न्यायालयाने या प्रकरणात जो चुकीचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला मागे घेऊन तो निर्णय बदलण्यात आला आहे.
पबचे मालक, मुलाचे वडील यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अतिशय कडक कारवाई झाली आहे. पण प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे, असा जो विरोधकांचा उद्योग सुरू आहे, तो योग्य नसल्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले आहे.
नागपूर विमानतळावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी डोंबिवली स्फोट प्रकरणावरून विरोधकांकडून होणाऱ्या टिकेलाही प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यातील कल्याणीनगरे येथे झालेल्या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला दिलेल्या जामीन देण्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली.
तसेच अपघात प्रकरणात पहिल्यांदाच अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही हलगर्जीपणा झाला नसून कठोर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे कोणतेही उद्योग हे काही एका दिवसात हलविता येत नाहीत. हे उद्योग स्थलांतरित केले गेले पाहिजे, या संदर्भात बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात यासाठी काहीही केलेले नाही.
त्यांनी या संदर्भात एक तरी निर्णय केला होता का? हे त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान फडणवीसांकडून देण्यात आले आहे. पण या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व उद्योगांना दुसरीकडे जागा देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.