पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या टीपी स्कीमला अजूनही अपेक्षित गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत प्राधिकरणाकडील माण- म्हाळुंगे, मांजरी -कोलवडी,औताडे-हांडेवाडी,वडाची वाडी,होळकरवाडी येथील दोन, अशा सहा सहा टीपी स्कीम मंजुरीअभावी रखडल्या आहेत.
म्हाळुंगे माण नगर रचना योजनेच्या (टीपी स्कीम) धर्तीवर पीएमआरडीएने प्रारूप विकास आराखड्यातील 27 पैकी पाच नगर नियोजन योजनांची ( टीपी स्कीम) सर्व प्रक्रिया पूर्ण करून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत. त्यास राज्य सरकारने दोन महिन्यांच्या आत एमआरटीपी अॅक्ट कायद्यानुसार अंतिम मान्यता देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एक वर्ष होऊन देखील अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही.
दरम्यान पीएमआरडीएकडून हद्दीचा प्रारूप विकास आराखड्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तो देखील अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. या प्रारूप विकास आराखड्यात पीएमआरडीएकडून २७ टीपी स्कीम प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी या सहा टीपी स्कीम आहेत. त्यांना मान्यता मिळेल, या भरवशावर पीएमआरडीएकडून या योजनांची अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली नाही.