श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव रस्त्याचे भाग्य उजळणार
समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – तांत्रिक अडचणीमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव रस्त्याच्या प्रश्नात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने लवकरच या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुराधा व राजेंद्र नागवडेंना ‘वेलकम गिफ्ट’ दिल्याची चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुराधा व राजेंद्र नागवडे यांनी गेल्या महिनाभरात अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या जयंती सोहळ्याला अजित पवारांची प्रमुख उपस्थिती होती. त्यातून नागवडे दाम्पत्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवाय, श्रीगोंद्याच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी जयंती सोहळ्यात दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव रस्त्याच्या निमित्ताने नागवडेंना पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच ‘वेलकम गिफ्ट’ दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव रस्त्याची गेली अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. मात्र, तांत्रिक अडचण असल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. परिणामी, या रस्त्याच्या किरकोळ डागडुजीवर समाधान मानावे लागत होते. या रस्त्याच्या कामासाठी नागवडे दाम्पत्याने थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचीही दिल्लीत भेट घेतली होती. आता उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्नात लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून लवकरच या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.
मंगळवारी (दि.३०) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी ताबडतोब श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव या दहा किलोमीटर रस्त्याची पाहणी करीत पुढील कार्यवाही सुरू केली. त्यामुळे लवकरच निधी मंजूर होऊन या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.
तालुक्यातील औद्योगिक वसाहत, श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव रस्ता, भीमावरील बंधारे आदी कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सकाळी भेट घेतली. त्यांनी या कामांसंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. श्रीगोंदा कारखाना ते इनामगाव रस्त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. लवकरच या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन त्याचे काम सुरू होईल.
– राजेंद्र नागवडे, अध्यक्ष, नागवडे कारखाना