पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील १११ प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी त्यात काही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपली होती. आता मुदतवाढ मिळाल्याने उमेदवारांना येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे दि. २५ जानेवारी रोजी समांतर आरक्षणासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध झाला. त्यानुसार भरती करताना सामाजिक व समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. समांतर आरक्षणामध्ये ३० टक्के महिला आरक्षण, ४ टक्के दिव्यांग, ५ खेळाडू आदी आरक्षणाबाबत स्पष्टता आहे. त्यामुळे या पदांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण व इतर सर्व बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सामाजिक व समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याने उमेदवारांना अर्ज करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज, तर अर्जाची हार्ट कॉपी येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.