पुणे – महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथे आता राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. मागील आठवड्यात याबाबतचा निकाल उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने दिला आहे. यासाठी भूसंपादन तसेच स्मारकाचे काम गतीने करण्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण, या कामाला “ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात येथील भाडेकरू तसेच जागा मालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने हे अपील दाखल करून घेतले आहे. त्यामुळे सुनावणीनंतरच या स्मारकाची पुढची दिशा ठरणार आहे. दरम्यान, महापालिकेने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रहिवासी आणि व्यावसायिकांनी अपील दाखल केले आहे.
न्यायालयाने सायंकाळी उशिरा अपील दाखल करून घेतल्याची माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांनी दिली. तसेच याबाबत माहिती घेऊन महापालिकेकडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे ऍड. चव्हाण यांनी स्पष्ट केले.