पुणे – शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता महत्त्वपूर्ण असून, सर्व शाळा आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस/रिक्षा चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असा सूचना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिल्या. पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत या सूचना दिल्या.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा. त्यासाठी वेळोवेळी स्कूल बसची तपासणी करावी. स्कूलबसचे वाहनचालक उत्तम प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे आहेत ना याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करावी. असे रितेश कुमार यांनी सांगितले. मगर म्हणाले, आपल्या क्षेत्रातील शासकीय, खासगी शाळात शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी. विनापरवानगी वाहतूक होत असल्यास परिवहन विभाग तसेच पोलीसांच्या निदर्शनास आणून द्यावे.
जिल्ह्यात १० हजार २७० हजार स्कूल बस असून ५ हजार ९२१ शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे काम सुलभपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू आहे. रिक्षामध्ये लहान विद्यार्थी खूप बसविले जातात. शाळा प्रशासनाने आणि पालकांनी त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. असे आरटीओ अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.
नियम मोडणाऱ्यांना एक कोटींचा दंड
शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ११ डिसेंबर दरम्यान २ हजार २१४ स्कूल बस तसेच १ हजार ४७८ इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ५७१ स्कूल बस व ३७९ इतर वाहने दोषी आढळली व ४७ वाहने अटकावून ठेवण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल १ कोटी १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे आरटीओ प्रशासनाने सांगितले.