पुणे – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अभ्यासक्रमांच्या संपूर्ण आराखड्यात बदल केले आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयातील डिप्लोमा कोर्स बंद केले जाणार आहेत. आता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘सर्टिफिकेट कोर्स’ आणि ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा’ अभ्याक्रमांऐवजी बारावी उत्तीर्णांसाठी ‘फाउंडेशन कोर्स’, तर पदवीधरांसाठी ‘अॅडव्हान्स्ड कोर्स’ सुरू केले जाणार आहेत.
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयमार्फत कौशल्य विकासासाठी विविध सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि अॅडव्हान्स्ड डिप्लोमा अभ्यासक्रम अॅडऑन कोर्सेस म्हणून चालविले जातात. पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सध्याचे सर्व प्रमाणपत्र, प्रगत प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर पदविकाचे नामाभिधान (नोमेनक्लेचर), श्रेयांक, कालावधी आदींबाबत धोरण ठरविण्यासाठी डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
या समितीचा अहवाल २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याला विद्यापीठाने मान्यता दिली आहे. त्यानुसार सर्टिफिकेट कोर्सऐवजी यापुढे फाउंडेशन कोर्स सुरू करता येणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाऐवजी, अॅडव्हान्स्ड कोर्स सुरू करता येणार आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
या निर्णयानुसार विद्यापीठाचे विभाग, सर्व संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना सध्या अस्तित्वात असलेले सर्व प्रमाणपत्र, प्रगत प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर पदविकाचे नोमेनक्लेचर, श्रेयांक, कालावधी, अभ्यासक्रम आदींची माहिती ३० डिसेंबरपर्यंत अद्ययावत करायची आहे. त्यासाठी विद्यापीठाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत माहिती अद्ययावत न केल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा अभ्यासक्रमाला मान्यता मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठाच्या प्रशासनाने दिल्या आहेत.