पुणे – पुणेकरांनी महापालिकेकडून मिळणाऱ्या कर सवलतीचा लाभ घेण्यसाठी सुट्टीच्या दिवशीही तब्बल 23 कोटींचा मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. दरम्यान, नागरिकांना सवलतीत कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असून 31 जुलैपर्यंत ही सवलत असणार आहे.
तसेच, मिळकतकर विभागाचे उत्पन्न 1150 कोटींवर गेले असून केवळ 5 लाख 63 लाख 12 हजार मिळकतींचा कर असून अद्यापही साडेसहा लाख मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. सवलतीच्या शेवटच्या दोन दिवसात महापालिकेस आणखी 50 ते 70 कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच शेवटचे दोन दिवस असल्याने रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 आणि सोमवारी 31 जुलै रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांना महापालिकेच्या करसंकलन केंद्राच्या ठिकाणी तसेच ऑनलाईन कर भरता येणार आहे.
तर मिळणार नाही लॉटरीची संधी
महापालिकेकडून या वर्षी पहिल्यांदाच नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांसाठी 1 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यात, कार, ई-बाईक, लॅपटॉप, मोबाईल, अशी बक्षिसे असणार आहेत. तर या लॉटरीमध्ये जे मिळकतकरधारक 31 जुलैपर्यंत कर भरणार आहेत. त्यांनाच या लॉटरीत सहभागी करून घेतले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून करण्यात आले.