पुणे – वेगाने धावणारी इनोव्हा…त्याच्यावर झडप टाकणारा पोलीस… दुसऱ्या कर्मचाऱ्याचीही मोटारीवर झडप… काच फोडण्याचा प्रयत्न… अखेर पाच आरोपी जेरबंद…हा थरार घडला निपाणी देवगड रस्त्यावर…निमित्त होते, ते पुण्यातील सराफाला लुटल्याच्या प्रकरणाचे…पोलिसांनी जिवाची बाजी लावून केलेल्या कारवाईमुळे “स्पेशल 26′ या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे रचलेला लुटीचा डाव उधळला गेला. सर्व 9 आरोपींच्या
24 तासांत मुसक्या आवळण्यात आल्या.
नंदकिशोर वर्मा (41, रा. दत्तनगर) हे त्यांचा मित्र व्यास यादव (34, रा. आंबेगाव खुर्द) याच्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी एका मोटारीमधून पाच व्यक्ती आल्या. “तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, बेकायदा सोन्याचा धंदा करता, तुमच्यावर इन्कमटॅक्सची रेड पडली आहे’ असे म्हणत वर्मा यांना गाडीत बसवून दरी पुलाजवळ नेले. तेथे कारवाई न करण्यासाठी वर्माकडे 75 लाख रुपये मागितले. यावेळी वर्माने व्यासला घरी पाठवून 20 लाख रुपये रोख व 30 तोळे सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून ऐवज घेऊन पळ काढला.
दरम्यान, याबाबतची फिर्याद दाखल करण्यासाठी वर्मासोबत व्यास यादव पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी पोलिसांना त्याचा संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी व्यासच्या साथीदारांचे लोकेशन शोधले. ते कोल्हापुरात होते. तातडीने उपनिरीक्षक नितीन शिंदे यांचे पथक दुचाकी आणि मोटारीने रवाना झाले. आरोपी मोटारीत देवगड-निपाणी रस्त्यावर थांबल्याचे दिसले.
पोलिसांची चाहूल लागताच ते मोटारीतून पळून जाऊ लागले. थांबण्याच्या इशारा डावलून गाडी पळवत होते. त्यामुळे पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व शिवदत्त गायकवाड मोटारीवर झेप घेऊन मोटारीला लटकले. तर पोलीस अंमलदार अभिजित जाधव व विक्रम सावंत यांनी इनोव्हा गाडीच्या काचेवर जोरदार प्रहार करून काच फोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या आरोपींनी गाडी थांबवली.
भैयासाहेब विठ्ठल मोरे, किरण कुमार नायर, मारुती अशोकराव सोळंके, उमेश अरुण ऊबाळे, अशोक जगन्नाथ सावंत व सुहास सुरेश थोरात अशा सहा जणांच्या मुसक्या अवळण्यात आल्या. त्यांनी व्याससह इतर पाच साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी लुटलेला मुद्देमाल रोहित संभाजी पाटील (23, रा. चऱ्होली) याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यालाही अटक करून गुन्ह्यातील माल हस्तगत केला.
ही कामगिरी उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, रवींद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, नीलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत व जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.
तब्बल 25 दिवस रचला प्लॅन
मुख्य आरोपी व्यास यादव हा फिर्यादी नंदकिशोर वर्मा याचा मित्र आहे. त्याने वर्माकडे सहा लाख रुपये उधार मागितले होते. मात्र वर्माने ते दिले नव्हते. मात्र वर्माने त्याला व्यवसायासाठी नवीन दुकान बघायला सांगितले होते. यामुळे त्याला वर्माकडे भरपूर पैसे असल्याची कल्पना होती, तर दुसरा आरोपी मारुती सोळंके हा एक खुनाच्या गुन्ह्यात फरारी आहे. त्यालाही न्यायालयात जामिनासाठी पैशांची गरज होती. यामुळे त्यांनी कट रचला. यासाठी त्यांनी तब्बल 25 दिवस एकत्र बसून प्लॅन आखला होता. इन्कमटॅक्स ऑफिसर वाटावे म्हणून यातील दोघांनी तसे कपडेही शिवून घेतले होते.