पुणे –उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या आठपैकी सहा सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाले. पाच वर्षीय एलएलबी, बीपीएड, एमपीएड, बीए-बीएस्सी बीएड, बीएड-एमएड या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असणाऱ्या सीईटीचा निकाल जाहीर झाला.
राज्य सीईटी सेलमार्फत सीईटी घेतली जाते. बीपीएड प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून 6 हजार 872 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार 480 विद्यार्थी दि. 8 ऑक्टोबरच्या ऑनलाइन परीक्षेला बसले होते. तर, मैदानी चाचणी परीक्षा 9 ते 14 ऑक्टोबरला घेण्यात आली होती. या परीक्षेला 5 हजार 425 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी जाहीर झालेल्या निकालात हे सर्व विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचाही निकालही गुरुवारी जाहीर झाला. या सीईटीला राज्यभरातून 24 हजार 822 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 16 हजार 66 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
एमपीएड सीईटीच्या परीक्षेला एक हजार 645 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक हजार 640 विद्यार्थी पात्र झाले आहेत. बीए-बीएस्सी बीएड या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या परीक्षा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला 1 हजार 333 विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. बीएड आणि एमएड तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला एक हजार 507 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 728 विद्यार्थी बसलेले होते. सर्व विद्यार्थी प्रवेशाला पात्र ठरले आहेत, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.