पुणे – अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय व सोलर बास्केट कंपनीच्या सहकार्याने एक अभूतपूर्व सौर वृक्षची (सोलर ट्री) निर्मिती करण्यात आली आहे. हा सौर वृक्ष सार्वजनिक ठिकाणी बसविण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक योगदान देताना अनंतराव पवार अभियांत्रिकीचे प्राध्यापक व विद्यार्थी आणि सोलार बास्केटचे संस्थापक अक्षय बमनोटे व निखील चोंदे यांच्या प्रयत्नांतून हा सौरवृक्ष निर्माण करण्यात आला आहे.
सौर वृक्षाची अनोखी रचना असून, सायंकाळी दिव्यांचे एक बेट तयार करते. सुमारे २,५०० चौरस फूट क्षेत्र प्रकाशित करण्याची याची क्षमता आहे. यामुळे उद्याने, सार्वजनिक परिसरांना सायंकाळच्या वेळी प्रकाश मिळू शकणार आहे. सहा लोकांच्या आसन व्यवस्थेसह आराम आणि सुविधा हे सौरवृक्षाच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सौरवृक्षास सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त सौर वृक्षाला डिजिटल घड्याळ बसवण्यात आले आहे. तसेच चार मोबाइल चार्जिंग पोर्ट आहेत. सार्वजनिक ठिकाणी सोयीचे केंद्र म्हणून सौर वृक्ष लोकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.
‘हा सौरवृक्ष विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत प्रयोगशाळा म्हणून काम करतो, विद्यार्थ्यांना नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देतो आणि भविष्यातील आव्हानांबद्दल सर्जनशीलपणे विचार करण्यास प्रोत्साहित करतो.” – डाॅ. सुनील ठाकरे, प्राचार्य