शेवाळेवाडी :जॉयविले बांधकाम साईटवरील धुरळाचे लोट संपूर्ण गावात पसरत असून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे
मांजरी – शेवाळेवाडी येथील जॉयविले (शापुरजी पलोणजी हौसिंग प्रा. लि. बांधकाम व्यावसायिक) या बांधकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायू तसेच ध्वनी प्रदूषण होत आहे.त्यामुळे हे बांधकाम थांबविण्यात यावे,अशी मागणी शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिमा शेवाळे तसेच माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी केली आहे.
त्यांसदर्भात शेवाळे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे.बांधकाम करत असताना या बांधकाम व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही केली आहे.कालव्याच्या भरावावरून बांधकाम साहित्य तसेच राडारोडा वाहून नेणारी अवजड वाहतूक केली जात आहे.त्यामुळे कालव्याचा भरावही खचला आहे. रस्त्यांवरील माती व धुरळा परिसरात पसरून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढले आहे. रात्री उशिरा पर्यंत बांधकाम सुरू असल्याने ध्वनी प्रदूषण होत आहे.
जॉयविले बांधकाम साईटवर काम करण्यासाठी मोठा मजूर वर्ग येथे असून त्यांची अधिकृत नोंदणी नसून येथे वारंवार भांडणे होत असून हे मजूर परिसरात उघड्यावर मद्यपान करून गावकऱ्यांना त्रास होईल असे वर्तन करत आहेत.असेही राहुल शेवाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जॉयविले या बांधकाम साईट मुळे स शेवाळेवाडी गावात मोठ्या प्रमाणात धुरळाचे लोट हे पसरत असून घरातील स्वयंपाक घरातही हात धुरळा येत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे व इतर आजार उद्भवत आहेत. याशिवाय रात्री उशिरापर्यंत काम सुरू असल्याने नागरिकांना झोप पूर्ण घेता येत नाही. बांधकाम मजूर हे मद्यपान करून गावात इतरत्र फिरत असतात. असे असतानाही प्रशासन त्याकडे कानाडोळा का करत आहे ? असा सवालही काही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे .
“राज्यात वेगाने वाढ होत असलेल्या वायू प्रदूषणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत मुंबईच्या उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेतली आहे.व त्या अनुषंगाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना निर्देश दिले आहेत. असे असतानाही जॉयविले बांधकाम त्याला जुमानत नाही. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष केंद्रित करून शेवाळेवाडी येथील या जॉयविले बांधकामावर त्वरीत कारवाई करावी.अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.” राहुल शेवाळे, माजी उपसरपंच, शेवाळेवाडी ग्रामपंचायत
“जॉयविल शापूरजी हाऊसिंगमध्ये, पर्यावरणीय शाश्वतता आणि समुदायाच्या कल्याणासाठी आमचे समर्पण अटूट आहे. एक जबाबदार विकासक म्हणून, आम्हाला बांधकाम क्रियाकलापांचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजतो. या चिंता कमी करण्यासाठी, आम्ही धूळ उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना अंमलात आणल्या आहेत, आवाज कमी करण्यासाठी प्रगत बांधकाम पद्धती आणि आमची एकूण पर्यावरणीय पाऊलखुणा कमी करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे. सर्व शासित कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हा आपल्या नीतिमत्तेचा आधारस्तंभ आहे. पर्यावरणीय कारभारावर आमचे लक्ष स्थिर आहे.” – प्रवक्ता जॉयविले शापूरजी हाऊसिंग